शोएब अख्तरची भविष्यवाणी; पाकिस्तान भारताला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये हरवणार


लाहोर – आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही यंदाची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असणार आहे. आयपीएलचा चौदावा हंगाम यूएईमध्ये पार पडल्यानंतर लवकरच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील १२ संघांना मुख्य अनिर्णित दोन गटात विभागले जाईल. पात्रता फेरीनंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. अनेक तज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी यूएईमध्ये होणाऱ्या या मोठ्या कार्यक्रमापूर्वी आपले मत आणि भविष्यवाणी करण्यास सुरवात केली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सातवे विजेतेपद कोण जिंकू शकेल, याचा अंदाज अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.

त्यात याबाबत एक भविष्यवाणी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही व्यक्त केली आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी ही पहिल्या मोसमाप्रमाणे होईल, असा अख्तरचा विश्वास आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया अंतिम सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानशी टक्कर घेईल. पण, यावेळी पाकिस्तानी संघ भारताला मागे टाकेल, असा दावाही अख्तरने केला.

स्पोर्ट्स तक यूट्यूब वाहिनीवर शोएब अख्तर म्हणाला, मला वाटते टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि भारत खेळतील, तसेच पाकिस्तानकडून भारत पराभूत होईल. यूएईमधील परिस्थिती भारत आणि पाकिस्तान या दोघांना अनुकूल असतील. दरम्यान कोणत्याही विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानकडून भारत हरलेला नाही.

दुसरीकडे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) पहिल्या हंगामात भारत आणि पाकिस्तानची एकदा भेट झाली नाही. डब्ल्यूटीसीच्या दुसर्‍या फेरीतही भारत आणि पाकिस्तान लीगच्या टप्प्यात एकमेकांशी स्पर्धा करणार नाहीत. अखेरच्या वेळी भारत आणि पाकिस्तान संघांमधील सामना २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत झाला होता. भारत आणि पाकिस्तानचा अखेरचा टी-२० विश्वचषक स्पर्धेती सामना २०१६च्या हंगामात कोलकाता येथे झाला होता. यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून १८० धावांनी पराभव पत्करावा लागला.