राज कुंद्राच्या पोलिस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ


अश्लील चित्रपटांच्या निर्मिती प्रकरणामध्ये १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक केली. आज म्हणजे शुक्रवारी २३ जुलै रोजी राजला दुपारी एकच्या सुमारास भायखळा कारागृहातून न्यायालयात नेण्यात आले होते. त्याला आज जामीन मिळणार होता. पण, राज कुंद्राला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात केली. राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने ७ दिवस मागितले आहेत.

त्याचबरोबर चौकशीत राज सहकार्य करत नसल्याचा आरोप मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. राज पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत नाही. या व्यतिरिक्त राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या व्यवसायाबद्दलचे अनेक प्रश्न टाळत आहे. सोबत मनी ट्रेलच्या संबंधीत प्रश्नांना देखील तो टाळत असल्यामुळे मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची याचिका केल्यानंतर न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.