पोलीस कोठडीमध्ये वाढ; कोरोनाचे कारण देत राज कुंद्राने घेतली उच्च न्यायालयात धाव


मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई जिल्हा न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचे सांगत राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सुनावणीविरोधात याचिका दाखल केली आहे. राज कुंद्राने याचिकेमध्ये आपल्याला बेकायदेशीपणे पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचे म्हटल्याचे ‘बेंच अ‍ॅण्ड बार’ने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे कारण देत कुंद्राने कोठडीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, असे आपल्या याचिकेत म्हटले आहे.

मुंबई जिल्हा न्यायालयाने आज राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि थोर्पे यांना मुंबई पोलिसांनी हजर केले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यता व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. पण आता या आदेशाला कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे.

परिनाम लॉ असोसिएट्सच्या माध्यमातून कुंद्राने याचिका दाखल केली असून ज्या कलमांखाली अपल्याला अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते असाही उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत आपल्याला अशाप्रकारे कायदा आणि नियमांचे पालन न करता पोलीस कोठडीत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. कुंद्राने कोरोनाचेही कारण या याचिकेमध्ये दिले आहे. भारताच्या सरन्यायाधिशांनी एका निकालादरम्यान तुरुंगामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे निरिक्षण नोंदवले होते, त्याचा दाखला कुंद्राने दिल्याचे ‘बेंच अ‍ॅण्ड बार’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.