रायगडमधील तळई गावात दरड कोसळल्यामुळे ३६ जणांचा दुर्दैवी अंत, तर ४० बेपत्ता


रायगड – रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे ३२ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर, याच भागातील साखर सुतारवाडी येथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथील घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर याखाली जवळपास ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.

या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत, त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तसेच, बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले, असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. माणगाव गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महाडमधील परिस्थितीत कोरोना तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये, याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तळई गावात दरड कोसळल्यामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय हृदय हेलावणारी अशी घटना या गावात घडली आहे. आता त्या गावातच मी आहे. आमच्या सोबत माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार निरंजन डावखरे सुध्दा उपस्थित आहेत. ही घटना काल सायंकाळी ४ वाजता घडली आहे, ४ वाजल्यापासून आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी किंबहुना गावाचा तलाठी सुद्धा पोहोचला नाही. आज सांगतात संपर्क साधू शकत नाही, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. परंतु दळणवळणेला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

तसेच, एनडीआरएफची टीम उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुले मदतीला आली, दिलासा देण्याचे काम त्या तरुणांनी केले, ग्रामस्थांचे स्थलांतर करत त्यांना तेथून बाहेर काढले त्यामुळे त्यांनी दिलासा दिला असून, प्रशासकीय अधिकार न आल्यामुळे ही शरम वाटणारी गोष्ट आहे. अनेक दिवसांपासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिला असून आम्ही सुद्धा सांगितले होते की, कोकणात सुविधा बळकट करा, त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात न आल्यामुळे हे जीव गेले.

जर अगोदरच टीम आली असती, तर आज हे निष्पाप जीव वाचले असते, परंतु एवढी बेपर्वाई प्रशासनाची लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच पाहिले नाही. सरकार ५ लाख देतील १० लाख देतील, पण गेलेले जीव परत येणार नाही. प्रशासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचला नव्हता. आता टीम आणि प्रशासकीय कर्मचारी पोहोचल्यानंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा आणि खाण्याचे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, असे आवाहन प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.