स्पेनच्या संसदेत उंदराची एन्ट्री, सभापतींनी फोडली किंकाळी

कोणत्याही देशाची संसद देशाची मानबिंदू मानली जाते. संसदेसाठी ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी खास सुरक्षा केलेली असते. पण तरीही स्पेनच्या अँडालुसिया संसदेत एका उंदराने एन्ट्री करून एकच गोंधळ माजवून दिल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्वप्रथम रॉयटर न्यूज एजन्सीने त्यांच्या ट्विटर अकौंटवर शेअर केला आहे.

उंदीर हा वास्तविक घाबरून जाण्यासारखा प्राणी नाही पण अचानक तो दिसला तर नैसर्गिक प्रतिक्रिया उमटते तीच बाब स्पेनच्या संसद सभापतींच्या बाबतीत घडली. सभापती मार्टा बोस्कुट भाषण देत होत्या आणि त्यांना अचानक उंदीर दिसल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया किंकाळी फोडण्यात झाली आणि मग त्यांनी तोंडावर हात ठेवला. उंदीर पाहताच अन्य सदस्यात सुद्धा पळापळ सुरु झाली आणि एकच गोंधळ उडाला. सभापतींनी वारंवार’ घाबरू नका, शांत राहा’ असे आवाहन केले पण परिणाम शून्य.

विशेष म्हणजे यावेळी संसदेत एका महत्वाच्या विषयावर चर्चा आणि मतदान व्हायचे होते पण उंदराने सगळ्यावर पाणी फिरवले. अखेर सुरक्षा एजन्सीने उंदीर पकडला तेव्हा सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.