हनिमून सोडून ऑलिम्पिक पदकासाठी दाखल झाले हे जोडपे

युक्रेनची महिला टेनिसपटू एलिना स्वितोलीना आणि फ्रांसचा टेनिसपटू गेल मोनाफिल्ड यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील आनंदापेक्षा ऑलिम्पिक मध्ये पदक मिळविणे अधिक महत्वाचे असल्याचा धडा घालून दिला आहे. हनिमून सोडून हे जोडपे टोक्यो ऑलिम्पिक मध्ये आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दाखल झाले आहे. एलिना आणि गेल हे दोघे वर्ल्ड क्लास टेनिस खेळाडू असून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आहे.

गेल्या शुक्रवारी एलिना आणि गेल यांनी स्वित्झर्लंड मध्ये एका शानदार कार्यक्रमात विवाह बंधन स्वीकारले आहे. पण ऑलिम्पिक मुळे त्यांना सध्या हनिमून साठी वेळ नाही. एलिना सांगते, एका वर्षात खूप स्पर्धा खेळायची आम्हाला सवय आहे. त्यामुळे आराम करायला सध्या वेळ नाही. सगळे लक्ष ऑलिम्पिक कडे आहे. हनिमूनबाबत नोव्हेंबर मध्ये विचार करणार आहोत. सध्या कसून सराव हेच रुटीन आहे. हे दोघेही सिंगल्स आणि डबल्स मध्ये सहभागी होणार आहेत.