स्मार्टफोन हॅक झाला, असे ओळखू शकाल

पेगासस स्पाइंग प्रकरणामुळे आपला स्मार्टफोन सुद्धा हॅक झाला असेल का अशी शंका येत असेल तर तुम्ही काही गोष्टी पडताळून पाहून त्याची खात्री करून घेऊ शकता. सर्वसामान्य इंटरनेट युजर्सना पेगाससची भीती बाळगायला नको पण अन्य काही स्पाय टूल्स किंवा अॅप्सबाबत मात्र सावधानता बाळगायला हवी. यातील काही टूल्स किंवा अॅप्स आर्थिक माहिती चोरणारी, काही फोटो गॅलरी, कॉल मेसेज डेटा चोरणारी आहेत आणि ती आपल्या फोन मध्ये लपली आहेत हे सहजासहजी कळून येत नाही.

तुमच्या फोनची बॅटरी नेहमीपेक्षा जास्त वेगाने संपत असेल तर फोनमध्ये स्पाय टूल्स किंवा अॅप्स असू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम फोनच्या बॅटरीवर चालणारी जी अॅप्स आहेत ती तपासून प्रथम बंद करून मग बॅटरी मॉनीटर करावी.

जी अॅप्स तुम्ही डाऊनलोड केलेली नाहीत ती जर फोन मध्ये दिसत असतील तर तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो. अशावेळी अशी सर्व अॅप्स डीलिट करून टाकावीत. फोन खूप स्लो झाला असेल किंवा थांबून थांबून काम करत असेल तर तुमच्या फोन मध्ये स्टील्थ मालवेलर असू शकते.

मोबाईल डेटाचा वापर नेहमीच्या तुलनेत अचानक अधिक वाढला तर स्पाय अॅप किंवा स्पाय सोफ्टवेअर तुमचा डेटा वापरत आहे असे समजू शकता. कारण ते इंटरनेटचा वापर करूनच तुमच्या हालचाली ट्रॅक करत असतात. अचानक अॅप्स क्रॅश होणे, अॅप्स लोड होण्यात अडचणी येणे, साईट विचित्र दिसणे ही सुद्धा फोन हॅक झाल्याची लक्षणे असू शकतात.

जाहिरातींमुळे फोनच्या स्क्रीनवर पॉपअप्स दिसतात हे खरे असले तरी खूप मोठ्या प्रमाणावर पॉपअप दिसत असतील तर काळजी घ्यायला हवी. एकप्रकारचे सॉफ्टवेअर डिव्हाईस तुमचा फोन जाहिरातींनी भरून टाकते, अश्या लिंक वर क्लिक करू नका. काही वेळा जे फोटो किंवा व्हिडीओ आपण घेतले नाहीत तेही दिसतात अश्यावेळी तुमच्या फोनच्या कॅमेऱ्यावर दुसराच कुणी नियंत्रण ठेऊन आहे अशी शक्यता आहे.

फोनचा फ्लॅश लाईट फोन उपयोगात नसतानाही ऑन राहत असेल तर दुसरेच कुणी तुमचा फोन नियंत्रित करत आहे अशा संशयाला जागा आहे. वापर नसतानाही फोन गरम होत असेल तर हॅकर्स तुमच्या फोनवर काम करत आहेत असा संकेत मिळू शकतो. तुम्ही न पाठविलेली माहिती किंवा कॉल, मेसेज दिसत असतील तर हॅकर्स तुमचा फोन वापरत आहेत असा संशय घेऊ शकता.