करोनाला हरवून, लस घेऊन तिघी मैत्रिणीचे शतकी वाढदिवसाचे सेलेब्रेशन

करोना ही आता जणू न संपणारी कथा बनली आहे. दररोज शेकडो बातम्या करोना संदर्भात येत आहेत आणि त्यामुळे करोनाबद्दलची भीती जनमानसात वाढत आहे. अर्थात या साऱ्या बातम्या निराशाजनक नाहीत तर त्यातील काही आशेचा किरण जगाविणाऱ्या ही आहेत. अशीच एक बातमी अमेरिकेतून आली आहे. करोनाला घाबरू नका आणि लसीकरण करून घ्या असा संदेश येथील तीन मैत्रिणींनी दिला आहे.

या तिघी न्युयॉर्कच्या मॅनहटन मध्ये एका सिनियर सिटीझन होम मध्ये राहतात. या तिघींनाही करोना झाला आणि त्यावर मात करून त्यांनी करोना लस घेतली. यातील विशेष असे की लसीचा पहिला डोस घेतल्यावर त्या तिघींनीही त्यांचा १०० वा वाढदिवस बर्थडे केक कापून साजरा केला. रुथ, लॉरेन आणि एडिथ अशी या आजीबाईंची नावे आहेत.

यातील लॉरेन आजी सांगतात, लस घेतल्यावर आम्ही एकदम खुश आहोत. जणू सेलेब्रिटी झाल्याचा फील येतो आहे. गेले काही महिने करोना भीतीदायक वाटत होता पण त्यावर आम्ही मात केली, लस घेतली त्यामुळे आता स्वतंत्र झाल्यासारखे वाटते आहे. जगभरात अनेकांना करोना मुळे जीव गमवावा लागला त्यामुळे भीती वाटणे साहजिक होते. पण लसीकरण करून घेणे हा त्यावरच सर्वात चांगला मार्ग आहे. सर्वानीच लसीकरण करून घ्यावे असा आमचा संदेश आहे.