कोरोनामुक्त झालेला ऋषभ पंत पहिल्या कसोटीत खेळणार का? बीसीसीआयने दिली महत्त्वपूर्ण माहिती


लंडन – सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला संघाचा विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता ऋषभ पंत कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे. गुरुवारी बीसीसीआयने ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज पहाटे ट्विट करून ही माहिती बीसीसीआयने दिली आहे. ऋषभ पंतचा कोरोना अहवाल ८ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कौंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्याला तो मुकला होता. ऋषभ पंत आता दुसरा सराव सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध आहे.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिल्या कसोटीमधील ऋषभ पंतच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. पण बीसीसीआयने आता त्याच्या तंदुरुस्तीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर ऋषभ पंतचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याखाली हॅलो ऋषभ पंत तू परत आल्याचे पाहून आनंद झाला, अशी कॅप्शन दिली आहे. डरहॅममध्ये भारतीय संघासोबत येण्यापूर्वी ऋषभ पंत हा दहा दिस आयसोलेशनमध्ये होता. सराव सामन्यात त्याच्याऐवजी के.एल. राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच राहुलने भारतीय संघातील आपली दावेदारी भक्कम करताना शतकी खेळीही केली होती.

दुसरीकडे भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील थ्रोडाऊन तज्ज्ञ दयानंद जारानी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यापासून आतापर्यंत आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, अतिरिक्त यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा आणि पर्यायी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन हे सुद्धा विलगीकरणात आहेत. हे तिघेही दयानंद यांच्या संपर्कात आले होते.