‘विकासपुरूष’वरुन रोहित पवारांचा भाजपला टोला


पुणे – भाजपच्या गेले काही दिवसांपासून पुण्यातील एका बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या बॅनरवर पुण्याचे नवे शिल्पकार, विकासपुरूष असे संबोधण्यात आले आहे. परंतु ज्यांनी पुण्यासाठी काहीच केले नाही, त्यांचे बॅनर भाजप झळकवत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, जे बोर्ड वॉर पुण्यात चालले आहे. पुण्यासाठी ज्या व्यक्तीने काही केलेच नाही अशा व्यक्तीचे बॅनर भाजपने पुण्याचे शिल्पकार म्हणून झळकावले आहेत. पण पुण्यातील ज्या प्रमुख इमारती आहेत. जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून या महत्त्वाच्या इमारतींचा यात समावेश आहे. त्या इमारतींचे काम सुरू असताना अजितदादा तेथे सकाळी ६ वाजता भेट द्यायचे, त्याठिकाणी पाणी निट मारले आहे का? व्यवस्थित काम होत आहे का? याचा आढावा घ्यायचे. सकाळी जिल्हाधिकारी इतर अधिकारी उपस्थित व्हायचे. उपमुख्यमंत्री, मंत्री असतानाही एवढ्या बारकाईने त्यांनी पुण्यात काम केले आहे. फंड आणला म्हणून काम संपले असे होत नाही तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन ते माहिती घ्यायचे असे त्यांनी सांगितले.