कोकणात पावसाचा हाहाकार! चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट ; संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा


रत्नागिरी : पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. मुंबईसह राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच गेल्या 4 दिवसांपासून कोकणात बरसणाऱ्या पावसाचे उग्र रूप पाहायला मिळत आहे. पावसाने धारण केलेल्या या उग्र रुपामुळे कोकणातील शहरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचे पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यामुळे चिपळुणात मदत पोहोचवणेही अशक्य बनले आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.

मुसळधार पावसाचा धुमाकूळ रत्नागिरी जिल्ह्यात सुरुच आहे. जिल्ह्यातील बहुतेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळून तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचे पाणी शिरले आहे. त्याचबरोबर चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरले आहे. नदीकाठच्या सुकाई मंदिरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे चिपळूणासाठी तातडीनं मदत पाठवण्याची मागणी केली आहे. शहरात रस्ते मार्गे मदत पोहोचणे शक्य नसल्यामुळे कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन नागरिकांची सुटका करण्याची मागणीही विनायक राऊतांनी केली आहे. 2005 नंतर असा पाऊस कोकणात कधीच पाहिला नव्हता, असेही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.