पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर हत्येच्या कटाचा आरोप


लाहोर: क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीमुळे गेल्या काही वर्षात चर्चेत आलेला पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. बाबरवर पाकिस्तानमधील ज्या महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता तिने आता बाबरवर आणखीन गंभीर आरोप केले आहेत.

हमीझा मुख्तारने असा आरोप केला आहे की, बाबरने तिची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. हमीझाच्या दाव्यानुसार लाहोरमधील कहना पोलिस ठाण्याबाहेर मोटरसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी तिच्यावर गोळीबार केला. माझा जीव धोक्यात असून मला मागील अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे तिने म्हटले आहे. हमीझाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे सरंक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी हमीझाची तक्रार दाखल करून घेतली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हमीझा मुख्तारने जानेवारी महिन्यात बाबरवर गंभीर आरोप केले होते. यात लैंगिक शोषणाचा देखील समावेश होता. बाबरने लग्नाचे अमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप हमीझाने केला होता. त्याचबरोबर बाबरने आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडले होते, असे हमीझाने म्हटले होते. यासाठी तिने गर्भपात केल्याचे पुरावे देखील दिले होते.

मी बाबरच्या कठीण परिस्थितीत त्याला साथ दिली होती आणि त्याला आर्थिक मदत देखील केली होती. आम्ही दोघे एकमेकांना शाळेत असल्यापासून ओळखतो. बाबरने २०१० साली लग्नाचे आश्वासन दिले होते. आम्ही घरच्यासोबत लग्नाबद्दल बोललो. पण त्यांनी नकार दिल्यावर, तो मला घरातून घेऊन गेला. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. २०१२ साली बाबरने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आणि त्यानंतर त्याची निवड राष्ट्रीय संघात झाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर बाबरचे मन बदलले, असा आरोप तिने पत्रकार परिषदेत केला होता.