खंडाळा घाटात दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प


पुणे – राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्याचा प्रभाव राज्यातील वेगवेगळ्या भागांवर होत आहे. संततधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील खंडाळा घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, रेल्वे मार्गावरील दरडी हटवण्यात येत आहेत, पण पावसाचा जोर अद्याप कायम असल्यामुळे दरडी हटवण्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. घाट परिसरात पावसासह जोरदार वारे देखील वाहत असल्याचमुळे दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना सध्या रस्ते मार्गे प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले असून गरज असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. अगोदरच रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत. पण तरीही इतर काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पावसाचा जोर ओसरून दरडी हटवल्यानंतरच रेल्वे सेवा सुरु होणे शक्य होणार आहे.