क्राइम ब्रान्चने जप्त केले राज कुंद्राच्या घरातील सर्व्हर आणि ७० पॉर्न व्हिडिओ


मुंबई : सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा, त्याचा साथीदार आणि मुख्य आरोपी उमेश कामत आहेत. सध्या पोलीस या दोघांची चौकशी करत आहेत. या चौकशीच्यावेळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी राज कुंद्राच्या घरी छापा मारला. त्यांनी या छाप्यामधून घरातील सर्व्हर आणि उमेश कामतने तयार केलेले ७० पॉर्न व्हिडिओ जप्त केले आहेत.

क्राईम ब्रान्चमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने हे सर्व व्हिडिओ बनवण्यात आले होते. त्याशिवाय हॉट शॉट अॅपवर अपलोड केलेले २० ते ३० मिनिटांचे सुमारे ९० व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने राजची चौकशी केली असता या व्हिडिओबद्दल त्याने माहिती दिली. हे व्हिडिओ उमेश कामतने युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरिनला पाठवले होते.

पोलिसांनी सर्वर जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे. त्यातून केनरिनसाठी पॉर्नोग्राफी मटेरिअल अपलोड केले जात होते की नाही हे समजू शकणार आहे. दरम्यान, आपण पॉर्न व्हिडिओ नाही तर अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इरॉटिक व्हिडिओप्रमाणेच व्हिडिओ तयार करत असल्याचा दावा राज कुंद्रा सातत्याने त्याच्या चौकशीत करत आहे.

दरम्यान, पॉर्न व्हिडिओ तयार करत असल्याचे राज कुंद्राचा साथीदार आणि आयटी हेड रायन थार्प याने मान्य केले आहे. तसेच या पूर्ण रॅकेटचा सूत्रधार कुंद्राच असल्याचेही त्याने सांगितले आहे. तसेच रायनचे काम केवळ कोणत्या तांत्रिक गोष्टींची काळजी घेत, कायद्यापासून पळवाट काढता येईल हे सांगायचे होते. पोलिसांनी राज कुंद्राचे वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन्ही कार्यालयांवर पोलिसांनी छापे घातले आहेत. पोलिसांच्या मते या प्रकरणातील आरोपींनी नवोदित मॉडेल, अभिनेत्री आणि अन्य मुलींच्या असहाय्य स्थितीचा फायदा घेत त्यांना अश्लिल चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले. हे सर्व चित्रीकरण मुंबईत बंगले भाड्याने घेऊन केले जायचे.