सहा महिन्यानंतर केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन


नवी दिल्ली: शेतकऱ्यांनी आज (गुरूवार, 22 जुलै) पुन्हा एकदा दिल्लीत केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात संसद मार्चची सुरुवात केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘शेतकरी संसद’द्वारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारले. आजपासून 9 ऑगस्टपर्यंत दररोज फक्त 200 शेतकऱ्यांना दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आंदोलनाची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दररोज 200 शेतकऱ्यांचा एक समूह पोलिसांच्या सुरक्षेत सिंघू बॉर्डरवरुन जंतर-मंतरला येईल आणि सकाळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन करेल.

दिल्लीत 26 जानेवारीला झालेल्या तीव्र आंदोलनानंतरही दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी दिली आहे. 22 जुलै पासून 9 ऑगस्टपर्यंत ही परवानगी असेल. भारतीय किसान यूनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत सिंघु बॉर्डरवरुन 200 शेतकऱ्यांसह जंतर-मंतरकडे रवाना झाले. जंतर-मंतरवर राकेश टिकैत शेतकरी संसदेचे आयोजन करतील आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनावरही लक्ष्य ठेवतील.

लाल किल्यापर्यंत यावर्षी 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यादरम्यान आंदोलकांनी आंदोलनाला तीव्र रुप देत लाल किल्यात घुसून झेंडे फडकावले होते. तसेच, पोलिसांना मारहाणही झाली होती. त्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी दिली असली तरी, यावेळेस सुरक्षेची पुर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी जंतर-मंतरवर सुरक्षेची पूर्ण तयार केली आहे. तर दिल्ली पोलिस आणि अर्धसैनिक दलाच्या 5-5 तुकड्या जंतर-मंतरवर तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.