बेजोस यांचे सरप्राईज, दोन लोकांना दिले प्रत्येकी ७४६ कोटींचे बक्षीस

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी त्यांच्या ब्लू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड स्पेस क्राफ्ट मधून अंतराळ प्रवास यशस्वी करून पृथ्वीवर परतल्यावर एक मोठी घोषणा करून सर्वाना चकित केले आहे. बेजोस यांनी सीएनएनचे कंट्रीब्युटर वॅन जोन्स आणि जोस आंद्रेस या दोघांना त्यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल १००-१०० मिलियन डॉलर्स म्हणजे प्रत्येकी ७४६ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जात असल्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे कोणतीही खास अट किंवा नियम नसताना या प्रकारचे बक्षीस प्रथमच दिले गेले आहे असे सांगितले जात आहे. बेजोस यांनी हा साहस आणि सभ्यता पुरस्कार ( करेज अँड सिव्हीलीटी अॅवॉर्ड) असल्याचे म्हटले असून हे दोघे या पुरस्काराची रक्कम त्यांना हवी त्या पद्धतीने खर्च करण्यास स्वतंत्र आहेत असे स्पष्ट केले आहे.

बेजोस म्हणाले, ज्या व्यक्तींनी समाजासाठी साहस आणि विभाजनकारी जगात एकजूट होण्यासाठी खास प्रयत्न केले त्यांचा हा सन्मान आहे. जोन्स आणि आंद्रेस यांनी या पुरस्कार रकमेचा वापर त्यांना हवा तसा करावा. या दोघांची निवड या पुरस्कारासाठी करताना त्यांनी समाजकार्यात दिलेले योगदान लक्षात घेऊन केली गेली आहे.

वॅन जोन्स यांनी ड्रीम कॉर्पस नावाचे क्रिमिनल जस्टीस रिफॉर्म ऑर्गनायझेशन सुरु केले आहे तर आंद्रेस यांनी वर्ल्ड सेंट्रल किचनची स्थापना करून जेथे नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे तेथे अन्न समस्या समाप्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. जे पृथ्वीला राहण्यालायक आणि अधिक चांगले बनविण्याच्या उद्देशाने कार्यरत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बेजोस यांनी हे पाउल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.