ढगांना लावली कळ, कोसळला मुसळधार पाउस

युएईच्या हवामान विभागाने रविवारी दुबई समवेत अनेक भागात मुसळधार पाउस पडल्याचा व्हीडीओ शेअर केला असून त्यात रस्ते दुथडी भरून वाहत असल्याचे दिसत आहे. अर्थात हा पाऊस नैसर्गिक नसून तो कृत्रिम पाउस आहे.

जगाच्या अनेक देशात यंदा उन्हाळा तीव्र आहे. दुबई आणि युएईच्या अन्य भागात सुद्धा तापमान ४५ ते ५० डिग्रीवर पोहोचले आहे. माणसे आणि प्राणी त्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. डेली मेलच्या बातमीनुसार उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी हा कृत्रिम पाउस पाडला गेला आहे.

त्यासाठी ड्रोनचा वापर करून जमलेल्या ढगांना इलेक्ट्रिक शॉक दिला गेला. क्लाऊड सीडिंग असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. युएईच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे तज्ञ या तंत्रज्ञानावर काम करतात. त्याचा मुख्य उद्देश देशात वार्षिक पाऊसमान वाढविणे हाच आहे. यात आर्द्रता असलेल्या ढगांत ड्रोनच्या सहाय्याने इलेक्ट्रिक चार्ज सोडला जातो. यामुळे पाण्याचे बारीक तुषार एकत्र केले जातात आणि त्याचे मोठे थेंब बनतात त्यामुळे पाउस पडतो. युएई अश्या पावसासाठी १५ दशलक्ष डॉलर्स खर्च करते.

युएई आणि दुबईचा समावेश जगातील टॉप १० अवर्षणग्रस्त देशात होतो. येथे वर्षाला फक्त ३ इंच पाउस होतो. उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळविण्यासाठी कृत्रिम पावसाचे प्रयोग येथे केले जातात.