जम्मू काश्मीर महिलांसाठी महत्वाचा ठरला हा निर्णय

जम्मू काश्मीर मधील ज्या मुलीनी बाहेरील राज्यातील मुलांशी विवाह केला आहे किंवा ज्या मुली बाहेरच्या राज्यात जन्माला येऊन जम्मू काश्मीर मध्ये आल्या आहेत त्यांना व त्यांच्या मुलांना अधिवास दाखला म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट मिळण्याच्या नियमात महत्वपूर्ण बदल केला गेला आहे. यामुळे या महिला किंवा त्यांच्याशी विवाह केलेले पुरुष सरकारी नोकरीस पात्र ठरणार आहेत. या संदर्भातली अधिसूचना लवकरच जारी केली जात आहे. त्याला केंद्रीय मंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखविला गेला आहे असे समजते. याचा फायदा जम्मू काश्मीरचे जावई आणि सुना दोघांनाही मिळणार आहे.

यापूर्वी कलम ३७० आणि ३५ ए लागू होते तेव्हा अधिवास दाखला मिळविण्यासाठी किमान १५ वर्षे राज्यात वास्तव्य, ठराविक काळासाठी नोकरी केलेली असणे आणि विद्र्यार्थ्याना सुद्धा निर्धारित वास्तव्य असणे बंधनकारक होते. या नियमातच आता नवीन कलम जोडले गेले आहे. त्यानुसार पती/पत्नीने डोमेसाईल सह विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या नियमाचा सर्वाधिक त्रास राज्याबाहेर विवाह केलेल्या मुली आणि बाहेरून राज्यातून विवाह करून आलेल्या मुली याना अधिक होत होता.

३५ एच्या जुन्या नियमानुसार जम्मू काश्मीर बाहेर लग्न केलेल्या मुलीना जम्मू काश्मीरचे नागरिकत्व सोडावे लागत होते शिवाय त्यांना संपत्ती, मालमत्ता यात अधिकार मिळत नव्हता. बाहेरून राज्यातून लग्न करून आलेल्या महिला पुरुषांना सुद्धा १५ वर्षे जम्मू काश्मीर मध्ये वास्तव्य केल्यावरच नोकरी, संपत्ती मध्ये काही अटींवर अधिकार मिळत होते. ३५ ए कलम रद्द केल्यावरही त्यातील या त्रुटी कायम राहिल्या होत्या त्या नव्या नियमाने दूर होणार आहेत असे समजते.