ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी मोदी सरकारविरोधात खटला दाखल करावा: संजय राऊत


नवी दिल्ली : ऑक्सिजनअभावी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केंद्र सरकारने केल्यानंतर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. यावरुन केंद्र सरकारवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली आहे. संजय राऊत दिल्लीत बोलताना म्हणाले की, ऑक्सिजन अभावी एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नसल्याचे केंद्रातील मोदी सरकारने म्हटले आहे. ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवारांनी केंद्राविरोधात खटला दाखल करावा, असे संजय राऊत म्हणाले. ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ते सत्य असल्याचेही ते म्हणाले.

राऊत म्हणाले की, ऑक्सिजनअभावी ज्यांचे नातेवाईक मरण पावले, ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन जे धावत होते, त्यांचा यावर विश्वास बसतो का? हे सांगायला हवे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान काल संसदेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला का? या प्रश्नाला उत्तर दिले आहे की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नसल्याचे लेखी उत्तरात सांगण्यात आले आहे.