सीएए कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला त्रास होणार नाही; मोहन भागवत


मणिपूर – देशातील प्रत्येक भारतीयाचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. आता मोहन भागवत यांनी आसाममधील एका कार्यक्रमात बोलत असताना देशात सीएए कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला त्रास होणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. हिंदू-मुस्लिम विभाजनाशी सीएए आणि एनआरसीचा कोणताही संबंध नाही. काही लोकांकडून राजकीय फायद्यासाठी याला धार्मिक रुप दिले जात असल्याचेही भागवत म्हणाले.

दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर मोहन भागवत आहेत. आसामच्या विविध क्षेत्रात आणि अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरासारख्या इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोहन भागवत यांनी बैठक घेतली. या बैठकीत संघटनेशी संबंधित तसेच कोरोना महामारी संदर्भात समाज कल्याण कामांचा आढावा व उपायांवर चर्चा करण्यात आल्याचे भागवत यांनी सांगितले.

विविधतेची देणगी भारताला मिळाली आहे. आपल्यासोबत हा इतिहास आज नव्हे, तर ४ हजार वर्षांपासून चालत आला आहे. एवढ्या साऱ्या विविधतेचे लोक येथे शांतीने नांदतात हे जगाच्या पाठीवर इतर कुठेच पाहायला मिळणार नाही. देशातील कोणत्याही विविधतेशी आपल्याला विरोध नाही. देशात विविध राज्य आहेत. नागरिक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सहजतेने प्रवास करत होते. पण समस्या तेव्हा निर्माण झाली, जेव्हा सांगितले जाऊ लागले की येथे एकच देव चालणार, एकच पद्धत चालेल. मुस्लिमांची लोकसंख्या वाढविण्याची मोहीम १९३० सालापासून योजनाबद्ध पद्धतीने सुरू झाली. काही प्रमाणात ते सत्य देखील ठरले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. पण आसाम मिळाले नाही, बंगाल मिळाले नाही, कॉरिडोर मागितला, तो मिळाला नाही मग जे मिळाले त्यात समाधान मानले आणि आता आणखी कसे मिळवले जाईल याचे प्रयत्न सुरू असल्याचे भागवत म्हणाले.