राज कुंद्राच्या अटकेनंतर ‘सुपर डान्सर-४’ शोमधून शिल्पा शेट्टी बाहेर?


पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पण शिल्पा शेट्टीच्या अडचणी राज कुंद्राच्या अटकेमुळे वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा परिणाम आता शिल्पाच्या कामावर होत असल्याचे दिसून येत आहे.

शिल्पा शेट्टीने गेल्या काही दिवसांपासून ‘सुपर डान्सर-४’ शूटिंग करणे रद्द केले आहे. मुंबईत मंगळवारी ‘सुपर डान्सर-४’ चे शूटिंग पार पडणार होते. पण राज कुंद्राला अटक झाल्यामुळे शिल्पा शेट्टी शूटिंगलला पोहचली नाही. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार मंगळवारी २० जुलैला या शोच्या एपिसोडचे शूटिंग मुंबईत पार पडणार होते. शिवाय या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार होती. पण अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचे शूटिंग रद्द केल्यामुळे उर्वरित परिक्षकांच्या उपस्थितीत शूटिंग पार पडले.

सूत्रांच्या माहितीनुसार आता करिश्मा कपूरलाच पुढील दोन दिवसांसाठी शोच्या टीमने लॉक केले आहे. त्याचबरोबर जर शोमध्ये शिल्पा पुन्हा आली नाही तर शिल्पाच्या जागी करिश्मा कपूर रिप्लेस होऊ शकते. सध्या शोची मेकिंग टीम शिल्पाच्या परण्याची वाट पाहत असून शिल्पाला शूटिंगवर परतणे शक्य झाले नाही तर टीम करिश्मा कपूरशी संपर्क साधणार आहे.

त्याचबरोबर येत्या २३ जुलैला शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा-२’ हा चित्रपट रिलीज हेणार होता. गेल्या काही दिवसांपासून त्यामुळेच शिल्पा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. पण चित्रपटाशी संबधीत सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जे अनेक इव्हेंट होणार होते. त्या इव्हेंटला देखील शिल्पा शेट्टी हजेरी लावू शकणार नाही. पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी सध्या तिच्या जुहू येथील घरी बहीण शमिता आणि मुलांसोबत आहे.