३१ ऑगस्टला होणार मनसेची विश्वविक्रमी दहीहंडी !


मुंबई – देशभरात कोरोना गेल्या दीड वर्षापासून ठाण मांडून बसला असल्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी तर सर्वच उत्सव रद्द करावे लागल्यामुळे सगळ्यांची निराशा झाली होती. मर्यादित स्वरुपात गणेशोत्सव देखील फक्त घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदा कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आता मनसेने दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. मनसेकडून यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

फेसबुक पोस्ट करून मनसे नेते अभिजित पानसे यांनी हे जाहीर केलं आहे. त्यांनी ही पोस्ट बुधवारी दुपारी केली असून त्यामध्ये विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार, असे म्हटले आहे. कोरोना संकट काळात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध लागू असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी संभ्र असताना राज्य सरकारने काही जाहीर करण्याआधीच मनसेने विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचे जाहीर केले आहे.