आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल


सांगली : विटा पोलीस ठाण्यात भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. 19 जुलै रोजी सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. त्यावेळी गर्दी जमवल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिर्जी नाईक यांचे स्मारक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारले जात आहे. नुकताच या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक गोपीचंद पडळकर होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक. बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक, अशा शब्दात फडणवीस यांनी बहिर्जी नाईक यांच्या शौर्याला नमन केले होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. आता गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला. गोपीचंद पडळकर म्हणाले, मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनायोद्धा यांच्या सुरक्षा हमी अधिकारचे वाटोळे करायला हे ठाकरे सरकार निघाल आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच मिळणार आहे. पण तरी देखील सरकारने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. मा. उच्च न्यायालयाने पाच वेळा तंबी देऊन सुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करत आहे. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसले असल्याची बोचरी टीका गोपीचंद पडळकरांनी केली.