देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ; काल दिवसभरात 40 हजारांहून अधिक बाधितांची नोंद


नवी दिल्ली : मंगळवारी दिवसभरात देशात 125 दिवसांनी कोरोनाच्या सर्वात कमी 30 हजार 93 बाधितांची नोंद करण्यात आली होती. परंतु, बुधवारी पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 42,015 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 36,977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 7 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास तीन कोटी 12 लाख 16 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 3 लाख 90 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 20 जुलैपर्यंत देशभरात 40 कोटी 54 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 34 लाख 25 हजार लसीचे डोस देण्यात आले. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 44 कोटी 91 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 18.52 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे.

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका समोर असताना सेरो सर्वेमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. तर जवळपास निम्या लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंगळवारी चौथ्या सेरो सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. हे सर्वेक्षण जून-जुलै दरम्यान करण्यात आले होते.

28,975 लोकांवर केलेल्या या सर्वेक्षणात 6 ते 17 वयोगटातील मुलांचा देखील समावेश होता. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच 67.6 टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर अजूनही 40 कोटी लोकांमध्ये अद्यापही अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीत. म्हणजे या 40 कोटी नागरिकांना कोरोनाचा धोका कायम आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 6, 910 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे.

काल (मंगळवारी) राज्यात 147 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 41 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 94, हजार 593 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (29), हिंगोली (41), यवतमाळ (15), गोंदिया (57) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 042 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मालेगाव, हिंगोली, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर काल शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 685 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,58,46,165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,29, 596 (13.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,60,354 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.