वेंकटेश्वर तिरुपतीला १ कोटी किंमतीची सोन्याची तलवार दान

भारताच्या श्रीमंत देवस्थानातील एक तिरुमला तिरुपती येथे दररोजचा मोठ्या संखेने भाविक दाने देत असतात पण सोमवारी हैद्राबाद येथील एक व्यावसायिक भाविकांनी दिलेले दान सध्या विशेष चर्चेचे ठरले आहे. व्यावसायिक एमएस प्रसाद यांनी वेंकटेश्वराला पाच किलो वजनाची ‘सूर्यकथारी’ तलवार दान दिली असून तिची किंमत १ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. प्रसाद वास्तविक गेल्या वर्षीच ही तलवार दान देणार होते मात्र करोना मुळे त्याला विलंब झाला असे समजते.

आंध्रातील तिरुपती देवस्थान हे सर्व भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले मंदिर आणि वेंकटेश्वराची स्वयंभू जागृत मूर्ती असलेल्या या स्थानी दररोज भाविक हजारोंच्या संखेने दर्शनासाठी येत असतात. दररोज येथे लाखो रुपये दान म्हणून भाविकांकडून दिले जातात. यंदाच्या वर्षात प्रसाद यांनी दिलेली तलवार आत्तापर्यंतचे सर्वात किंमती दान ठरले आहे. पाच किलो वजनाच्या या तलवारी मध्ये तीन किलो चांदी आणि २ किलो सोन्याचा वापर केला आहे. कोईमटूर येथील अतिशय कुशल सराफांनी सतत सहा महिने परिश्रम करून ही देखणी तलवार तयार केली आहे.

वैदिक संस्कृती मध्ये सूर्यकटारी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तलवारीला आंध्र भागात सूर्यकथारी म्हटले जाते. तिरुपतीच्या हातात अनेकदा हे शस्त्र दिसते. भगवान विष्णूच्या या तलवारीला नंदक असेही म्हणतात. स्वतः सूर्याने ही तलवार विष्णूला दिली होती अशी मान्यता आहे.