बेजोस यांची अंतराळ वारी सफल, नोंदविली तीन रेकॉर्ड

जगातील सर्वाधिक श्रीमंत जेफ बेजोस यांनी त्यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीच्या न्यू शेफर्ड स्पेस क्राफ्ट मधून केलेली अंतराळ वारी सफल झाली असून मंगळवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वा. ४२ मिनिटांनी अंतराळात झेपावलेले हे रॉकेट ११ मिनिटे आणि १० सेकंदानंतर पृथ्वीवर सुखरूप परतले. या अंतराळ उड्डाणाने नवी तीन रेकॉर्ड नोंदविली गेली आहेत.

पहिले म्हणजे अंतराळात जाणारे बेजोस पहिले अब्जाधीश नाहीत मात्र जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ मार्क, वॅली फंक, ऑलिव्हर डेमेन हे साथीदार होते. या उड्डाणाकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. या उड्डाणाने वॅली अंतराळ झेप घेणाऱ्या पहिल्या सर्वाधिक वयाच्या व्यक्ती ठरल्या तर ऑलीव्हर अंतराळात जाणारा सर्वात लहान वयाचा युवक ठरला. ब्रिटनचा अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रान्सन यांनीही ११ जुलै रोजी त्यांच्या व्हर्जिन स्पेस क्राफ्ट मधून अंतराळ वारी केली आहे. यामुळे आता जगातील अब्जाधीश लोकांत अंतराळ रेस सुरु झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

बेजोस यांच्या न्यू शेफर्डने अंतराळ सीमा म्हणून ओळखली जाणारी ‘कर्सन लाईन’ गाठली. इंटरनॅशनल एरोनॉटीक्स बॉडीने रेखांकित केलेली ही रेषा पृथ्वीचे वातावरण आणि अंतराळ यातील सीमा मानली जाते. बेजोस यांच्या न्यू शेफर्डने १०० किमीची उंची गाठल्याने त्यांनी रिचर्ड ब्रान्सनच्या तुलनेत अधिक अंतर कापले असे समजते. बेजोस या प्रवासाला अतिशय स्टायलिश अवतारात गेले होते. त्यांनी डोक्यावर काऊ बॉय हॅट घातली होती. पृथ्वीवर परतल्यावर त्यांनी सर्वप्रथम मैत्रिणीला मिठी मारली आणि अंतराळ प्रवासाचा अनुभव अविश्वसनीय होता असे सांगितले.