बंगाल फत्ते करून ममतादीदींची नजर गुजराथवर 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  मोदी सरकार विरोधात अधिक आक्रमक झाल्या आहेत. आता त्यांनी मोदी आणि अमित शहा यांचे गृहराज्य गुजराथ सर करण्यासाठी कंबर कसली असल्याचे संकेत दिले गेले आहेत. गुजराथ मध्ये प्रथमच ममता दिदींचे गुजराथी भाषेतील बॅनर अहमदाबाद येथे झळकले असून त्यासाठी शहीद दिनाचे निमित्त साधले गेले आहे. विशेष म्हणजे गुजराथ मध्ये पुढच्या वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

यापूर्वी ‘शहीद दिवस’ फक्त बंगाल पुरताच साजरा होत होता. १९९३ मध्ये कोलकाता येथे युवा कॉंग्रेस रॅलीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून हा शहीद दिन बंगाल मध्ये पाळला जातो. तृणमुल कॉंग्रेसने त्याची सुरवात केली होती. यावेळी मात्र ममता दीदी अनेक राज्यात या दिनाच्या निमित्ताने व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत. तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, त्रिपुरा, गुजराथ, उत्तरप्रदेश या राज्यात ममतादिदींचे भाषण प्रसारित केले जाणार आहे. करोना मुळे सलग दुसऱ्या वर्षी दीदी व्हर्च्युअल बैठक घेत आहेत.

गुजराथ मध्ये ममता दिदींचे या कार्यक्रमासंदर्भात प्रथमच बॅनर झळकले आहे. त्यावरच मजकूर सुद्धा गुजराथी भाषेत आहे. यंदा हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्याच्या निर्णय ममता दीदी आणि तृणमूल कॉंग्रेसने घेतला आहे.