टोक्यो ऑलिम्पिक- जाजा सर्वात लहान तर ६६ वर्षीय आजी सर्वात मोठी खेळाडू

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै रोजी सुरु होत असून यंदा या स्पर्धेत सिरियाची टेबलटेनिस पटू जाजा हेंड ही १२ वर्षाची खेळाडू सर्वात लहान वयाची तर अश्वारोहण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या घोडेस्वार मेरी हन्ना या ६६ वर्षाच्या आजीबाई सर्वात अधिक वयाच्या खेळाडू सहभागी होत आहेत. सर्वात अधिक वयाचा पुरुष खेळाडू ऑस्ट्रेलियाचे घोडेस्वार अँड्र्यू हेय हे असून त्यांचे हे आठवे ऑलिम्पिक आहे.

जगात १५५ व्या स्थानावर असलेल्या जाजा हिने फेब्रुवारी मध्ये वयाची ११ वर्षे पूर्ण करताना ऑलिम्पिक तिकीट मिळविले आहे. जॉर्डन येथे झालेल्या वेस्ट एशिया क्वालीफायर स्पर्धेत तिने तिच्याहून वयाने ३१ वर्षे मोठी असलेल्या ४२ वर्षीय मारियाना शविलन हिचा पराभव करून ऑलिम्पिक पात्रता फेरी जिंकली. सिरीयाचे सहा खेळाडू दल टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सहभागी असून त्यात जाजा एकटी महिला आहे. यापूर्वी ऑलिम्पिक मध्ये सर्वात लहान वयाच्या खेळाडूचे रेकॉर्ड नेपाळच्या जलतरणपटू १३ वर्षीय गॅरिका सिंह हिच्या नावावर होते.

६६ वर्षीय आजी मेरी या तीन नातवंडांच्या आजी असून त्यांना या स्पर्धेत सुवर्णपदकाची अभिलाषा आहे. या वयात ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या त्या कदाचित पहिल्याच वृद्ध महिला असतील. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अँड्र्यू हे सर्वाधिक ८ ऑलिम्पिक खेळलेले खेळाडू ठरले असून त्यांनी आतापर्यंत ऑलिम्पिक गेम्स मध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

भारताची निशाणेबाज ४० वर्षीय तेजस्विनी सर्वाधिक वयाची ऑलिम्पिक मध्ये पदार्पण करणारी भारतीय खेळाडू ठरली आहे. महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या तेजस्विनीने २००८ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले असून त्यानंतर अनेक स्पर्धात मेडल्सची कमाई केलेली आहे.