राज कुंद्राची न्यायालयाने केली पोलीस कोठडीत रवानगी


मुंबई – अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अटक झाली. मढ परिसरातील एका बंगल्यावर फेब्रुवारी महिन्यात टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले होते. सोमवारी राज कुंद्राला त्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून अटक करण्यात आली. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता, त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री, तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस गेल्या काही महिन्यांपासून मढ परिसरातील त्या बंगल्यातील पॉर्न फिल्म प्रकरणाविषयी तपास करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उधळून लावला होता. यावेळी एका मॉडेलची सुटका करण्यात आली होती. ही मॉडेल मुंबईत बॉलिवुडमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली असताना पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अडकल्याची माहितीनंतर समोर आली.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा संबंधित पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे. राज कुंद्राच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याच आधारावर पोलिसांनी आज सकाळी रायन थार्प या व्यक्तीला अटक केली आहे. रायन थार्प देखील राज कुंद्राशी थेट संबंधित असून पॉर्न फिल्म निर्मितीमध्ये त्याचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.