पेगॅससची माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेवर पाळत


नवी दिल्ली : अनेक धक्कादायक बातम्या पेगॅसस स्पायवेअरच्या हेरगिरीच्या प्रकरणातून बाहेर येत आहेत. पेगॅससच्या माध्यमातून देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेवर, तिच्या कार्यालयातील तीन मोबाईल नंबरवर आणि त्या महिलेच्या नातेवाईकांवर पाळत ठेवल्याची माहिती समोर आल्याचे द वायरने आपल्या वृत्तात म्हटले आहे. देशातील पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते आणि प्रमुख व्यक्तींवर इस्त्रायलच्या कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरच्या माध्यमातून केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यम समूहांनी एका मालिकेतून केला आहे.

लैंगिक शोषणाचा आरोप देशाच्या तत्कालीन सरन्यायाधीशांवर केल्यानंतर संबंधित महिलेला पेगॅसस स्पायवेअरच्या लिस्टमध्ये टाकण्यात आल्याचे वृत्त फ्रान्सच्या एका माध्यमाने दिले आहे. या महिलेच्या कार्यालयातील तीन स्टाफ, महिलेचा पती आणि तिच्या जवळच्या इतर सात नातेवाईकांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली होती. ज्या लोकांवर पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली होती, फ्रान्सच्या एका माध्यमाच्या हाती त्या लोकांची यादी लागली आहे. त्यामध्ये माजी सरन्यायाधीशांवर आरोप करणाऱ्या महिलेची आणि तिच्याशी संबंधित 11 लोकांचे नाव समाविष्ट असल्याचे समोर आले आहे. माजी सरन्यायाधीशांवर या महिलेने केलेले आरोप हे गंभीर असले तरी त्यामुळे देशाच्या सुरक्षेला कोणता धोका होता किंवा कोणती नॅशनल इमर्जन्सी होती, हे समजायला काही मार्ग नसल्याचे मत अनेकानी व्यक्त केले आहे.

मदत करण्याच्या बदल्यात माजी सरन्यायाधीशांनी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. त्यांच्या मागणीला विरोध केल्यानंतर आपली काही आठवड्यातच तीन वेळा बदली करण्यात आल्याचेही त्या महिलेने सांगितले होते. शेवटी आपल्याला नोकरीवरुन कमी करण्यात आल्याचेही तिने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले होते. त्या महिलेच्या पतीच्या एका भावालाही न्यायालयातील नोकरीवरुन कोणतेही स्पष्टीकरण न देता काढून टाकण्यात आले होते.

नोकरीवरुन कमी केल्यानंतर आपल्याला दिल्ली पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली त्रास दिल्याचा आरोपही तिने केला होता. त्याच वेळी ज्या व्यक्तीची आपण कधीच भेट घेतली नाही, अशा व्यक्तीने आपल्यावर लाच घेतल्याचा आरोप केला आणि या प्रकरणात आपल्याला तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोपही या महिलेने केला होता. आपल्या परिवारावर पाळत ठेवणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी तुरुंगात असताना दोन पोलिसांनी आपल्याला त्रास दिल्याचेही या महिलेने सांगितले होते. या सर्व आरोपांचे सरन्यायाधीशांच्या कार्यालयाने खंडन केले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन वरिष्ठ न्यायाधीशांची एक समिती नेमण्यात आली होती. संबंधित महिलेने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे या समितीच्या अहवालात सांगण्यात आले होते. या महिलेने समितीच्या या अहवालावर नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून असलेली न्यायाची अपेक्षा संपुष्टात आल्याची भावना तिने व्यक्त केली होती.

केंद्र सरकारने पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यामातून काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रननितीकार प्रशांत किशोर, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सध्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांच्यावरही पाळत ठेवल्याचे फ्रान्सच्या माध्यमाने स्पष्ट केले आहे.