पालघर घटनेची मध्य प्रदेशात पुनरावृत्ती; साधूंना लहान मुलांचे अपहरणकर्ते समजून मारहाण


भोपाळ – मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात दोन साधूंना लहान मुलांचे अपहरणकर्ते समजून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर साधूंना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील या घटनेने महाराष्ट्रातील पालघर घटनेची आठवण करुन दिली आहे. चोर असल्याच्या संशयावरुन एप्रिल २०२० रोजी पालघरमध्ये दोन साधूंची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली होती.

इंदोरच्या दिशेने मध्य प्रदेशातील हे दोन साधू प्रवास करत होते. यावेळी काही लहान मुलांकडे त्यांनी पुढील रस्त्यासंबंधी चौकशी केली. यावेळी मुले साधूंना घाबरली आणि तिथून पळून गेली. काही वेळाने तिथे जमाव आला आणि हे साधू लहान मुलांचे अपहरणकर्ते असल्याचे समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी पिठमपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. व्हिडीओच्या माध्यमातून आम्हाला काही लोकांनी साधूंना मारहाण केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आहे. पोलीस यासंबंधी सर्व तपास करणार असून मारहाणीचे नेमके कारण काय याची माहिती मिळवत असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांनी सांगितले आहे.