आयसीएमआरचा सल्ला; सर्वात आधी प्राथमिक शाळा सुरू करा


नवी दिल्ली – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देशात वर्तवली जात असतानाच, आज (मंगळवार) चौथ्या राष्ट्रीय सेरोसर्वेचे निष्कर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आहे की, देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अ‍ॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत. त्याचबरोबर, अद्यापही देशातील जवळपास ४० कोटी नागरिकांना कोरोनाचा धोका असल्याचही समोर आले आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोविडचा संसर्ग झाला व त्यांच्यामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत.

व्हायरल इन्फेक्शनचा सामना लहान मुले अधिक चांगल्या प्रकारे करु शकतात, त्यामुळे प्रथम प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणे योग्य ठरेल, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) व्यक्त केले आहे. कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होत असताना आता मुलांना लवकरच शाळेत पाठविले जाऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारतीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले की, मुलांमध्ये अ‍ॅण्टीबॉडीजचे प्रमाण जास्त आहे. तसेच मुले प्रौढांपेक्षा या प्रादुर्भावाचा जास्त सामना करू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना शाळेत पाठविले जाऊ शकते.