देशातील ४० कोटी नागरिकांना अद्यापही कोरोनाचा धोका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी


नवी दिल्ली – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देशात वर्तवली जात असतानाच आज (मंगळवार) चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेचे निष्कर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आहे की, देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळून आले आहेत. त्याचबरोबर, अद्यापही जवळपास ४० कोटी भारतीयांना कोरोनाचा धोका असल्याचेही समोर आले आहे. या सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत.

चौथ्या सेरो सर्व्हेची आकडेवारी आयसीएमआरने जाहीर केली आहे. हा सर्व्हे जून-जुलै दरम्यान करण्यात आला होता. २८ हजार ९७५ लोकांवर केल्या गेलेल्या सर्व्हेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता. सर्व्हेमध्ये सहभागी ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, म्हणजेच ते कोरोनाबाधित झाले होते. या सर्व्हेमध्ये २८ हजार ९७५ लोकांना सहभागी करून घेतले गेले होते. यामध्ये ६ ते ९ वर्ष वयोगटातील २ हजार ८९२ मुले, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ मुले आणि १८ वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या २० हजार २८४ जणांचा समावेश होता.

या सर्व्हेमध्ये हे देखील दिसून आले की, ६ ते ९ वर्षाच्या ५७.२टक्के आणि १० ते १७ वर्षाच्या ६१.६ टक्के मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळल्या आहेत. तर, १८ ते ४४ वर्षाच्या ६६.७ टक्के, ४५ ते ६० वर्षांच्या ७७.६ टक्के आणि ६० वर्षावरील ७६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या आहेत. सर्व्हेमध्ये सहभागी ६९.२ टक्के महिला आणि ६५.८टक्के पुरूषांमध्ये कोविड विरोधात अँटीबॉडीज आढळल्या आहेत. शहरी भागात राहणाऱ्या ६९.६ टक्के आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ६६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज होत्या.

या सर्व्हेमध्ये सहभागी १२ हजार ६०७ लोक असे होते, ज्यांनी लस घेतलेली नव्हती. ५ हजार ३८ जण असे होते ज्यांनी एक डोस घेतलेला आहे आणि २ हजार ६३१ जण दोन्ही डोस घेतलेले होते. सर्व्हेद्वारे समोर आले की, दोन्ही डोस घेतलेल्या ८९.८ टक्के जणांमध्ये आणि एक डोस घेतलेल्या ८१ टक्के जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. तर ज्यांनी लस घेतली नव्हती अशा पैकी ६२.३ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या. त्यामुळे असे मानले जात आहे की लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज निर्माण होत आहे.