कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आसाममधील महिला डॉक्टरला अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटची लागण


दिब्रुगड : आसाममधील एका महिला डॉक्टरला एकाच वेळी कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा या दोन्ही व्हॅरियंट्सची लागण झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या दिब्रुगड येथील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात केलेल्या चाचण्यांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकाच वेळी दोन प्रकारच्या व्हॅरियंट्सची लागण होण्याची ही भारतातील पहिलीच ज्ञात घटना असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त एबीपी लाईव्ह, तसेच हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस संबंधित महिला डॉक्टरने घेतले होते. दुसरा डोस घेतल्यानंतर एका महिन्यानंतर या डॉक्टरला कोरोनाच्या दोन्ही व्हॅरियंट्सची लागण झाली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले नाही. तसेच तिला लक्षणेही सौम्य प्रकारची होती. घरच्या घरीच केलेल्या उपचारांनी ती बरी झाली. संबंधित महिलेचे पतीही डॉक्टर असून, त्यांनाही अल्फा व्हेरियंटची लागण झाली होती. हा व्हेरियंट सर्वांत आधी ब्राझीलमध्ये आढळला होता.

अशा प्रकारचा दुहेरी संसर्ग तेव्हाच होतो, जेव्हा दोन व्हॅरियंट्सची एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी किंवा अगदी थोड्या अंतराने लागण होते. एखाद्या व्यक्तीला एका व्हॅरियंटचा संसर्ग होतो, त्यानंतर दोन-तीन दिवसांत आणि शरीरात अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होण्याच्या आधी दुसऱ्या व्हॅरियंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा कोणत्याही प्रकारे संपर्कात आल्यास दुसऱ्या व्हॅरियंटचा संसर्ग होऊ शकतो, असे प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. जे. बोर्काकोटी यांनी सांगितले.

2021च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला आसाममध्ये आढळत असलेल्या बहुतांश कोरोनाबाधितांना अल्फा व्हॅरियंटचा संसर्ग झाला होता. तसेच, एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर होत असलेल्या संसर्गांमध्ये डेल्टा व्हॅरियंटच्या संसर्गांचं प्रमाण जास्त होते, असेही डॉ. बी. जे. बोर्काकोटी यांनी स्पष्ट केले.आसाममध्ये सध्या 20 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. तसेच, दररोज दोन हजार नवे रुग्ण आढळत असल्याचे ‘एबीपी लाइव्ह’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दिब्रुगडमध्ये सर्वांत जास्त रुग्णसंख्या असल्याने तिथे कोरोनाविषयक निर्बंध कडक करण्यात आले आहेत.