खऱ्या बंदुका बाजारात, पण खेळण्यातील बंदुकांवर अमेरिकेत आहे बंदी

अमेरिकेतील गन कल्चर आजकाल खुपच चर्चेत आहे. खुल्या बाजारात विकली जाणारी शस्त्रे आणि त्यांची खरेदी किती प्रमाणात वाढत चालली आहे याच्या बातम्या सुद्धा नेहमी येत असतात. सार्वजनिक जागी गोळीबार करण्याच्या घटना तेथे नेहमीच्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांना हे माहिती नसेल की अमेरिकेत खऱ्या सारख्या दिसणाऱ्या खेळण्यातल्या बंदुका बनविण्यास बंदी आहे. त्यांचे उत्पादन, विक्री बाबत कडक नियम असून नियम मोडणाऱ्याना दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो.

खेळण्यातील बंदुकीप्रमाणे दिसणारी खरी बंदूक बनविल्याप्रकरणीची चर्चा सध्या जोरात असून लेगो या विश्वप्रसिद्ध कंपनीच्या खेळण्यातील बंदुकीप्रमाणे दिसणारी एक खरी बंदूक कल्पर प्रिसिजन या कंपनीने बाजारात आणली होती. त्यावरून वाद सुरु झाल्यावर लेगो कंपनीने या बंदुकीचे उत्पादन बंद करा अशी मागणी केली आणि शेवटी वकिलांशी चर्चा केल्यावर कल्पर प्रिसिजनला या बदुकीचे उत्पादन थांबवावे लागले आहे.

अमेरिकेत खरे हत्यार बनविणे आणि त्याची विक्री खरेदी सोपी आहे पण खेळण्याबाबत मात्र कडक नियम आहेत. मुलांच्या खेळण्यात बंदुका असाव्यात का यावरून सुद्धा नेहमी वाद सुरु असतात. १९६८ मध्ये मार्टीन ल्युथर किंग आणि त्यापाठोपाठ जून मध्ये रोबर्ट केनेडी यांची हत्या झाल्यापासून अनेक बड्या स्टोर्सने टॉय गन विक्री बंद केली होती. नंतर काही विशिष्ट अटींवर या टॉय गन विक्रीला परवानगी दिली गेली होती. न्युयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो, मिशिगन मध्ये आजही खऱ्या दिसणाऱ्या, पण खेळण्यातील बंदुका विक्रीवर बंदी आहे. नियम मोडणाऱ्याना १ हजार डॉलर्स दंड अथवा १ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागतो.