आता अंतराळात करता येणार विवाह

आजकाल डेस्टीनेशन वेडिंगचे प्रस्थ वाढते आहे. आपले लग्न यादगार व्हावे म्हणून लोक विविध कल्पना लढवून विवाह समारंभ काही हटके पद्धतीने करण्याचे ठरवितात. कुणी विमानात, कुणी पाण्याखाली असे अनेक प्रकार त्यासाठी अवलंबिले जातात. त्यात आता नवीन प्रकारची भर पडणार असून इच्छुक आता अंतराळात सुद्धा विवाह करू शकणार आहेत. फ्लोरिडाची कंपनी ‘स्पेस पर्स्पेक्टिव’ तुमचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार आहे.

फुटबॉल स्टेडियमच्या आकाराची एक अंतराळ बलून कॅप्सूल त्यासाठी वापरली जाणार आहे. २०२४ पासून ही सेवा सुरु होत आहे. समुद्रसपाटीपासून १ लाख फुट म्हणजे १९ मैल उंचीवर तरंगत्या कॅप्सूल मध्ये विवाह, वाढदिवस, कॉर्पोरेट इव्हेंट असे अनेक कार्यक्रम सादर करता येतील शिवाय वरून पृथ्वीचे मोहक रूप सुद्धा पाहता येणार आहे. सध्या या उड्डाणासाठी बुकिंग सुरु आहेत. त्यासाठी १.२५,००० डॉलर्स म्हणजे १ कोटी रुपये खर्च करावे लागतील. सहा तासाच्या या उड्डाणांत आठ पाहुणे सामील होऊ शकतील.

या बलूनमध्ये बाथरूम, बार आणि ऑनबोर्ड वायफाय सुविधा आहे. पर्स्पेक्टिवचे नेतृत्व फ्लोरिडा मधील टॅबर मॅक्कलन, जेन पॉयन्टर या पतीपत्नी कडे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ च्या सर्व फ्लाईट बुक झाल्या असून आता २०२५ साठी बुकिंग सुरु आहे.