लखनौ मध्ये धूम माजवत आहे मल्लिका

लखनौच्या पॉश भागात सध्या मल्लिका धूम माजवते आहे. गैरसमज करून घेऊ नका. मल्लिका हा एक विशेष जातीचा आंबा असून सध्या या आंब्याला प्रचंड मागणी आहे. नीलम आणि दशेरी या दोन आंब्यांच्या संयोगातून मल्लिका तयार झाला आहे. म्हणजे याची आई नीलम, वडील दशेरी आहेत. दशेरी प्रमाणे हा लांब आहे पण आकाराने मोठा आहे. काही आंब्याचे वजन ७०० ग्राम पर्यंत आहे. सध्या तो चौसा आणि सफेदा या लोकप्रिय आंब्याना चांगलीच टक्कर देतो आहे.

मल्लिकाचा स्वाद अलग आहे त्यामुळे दशेरीच्या तिप्पट भावात तो विकला जात आहे. केंद्रीय आंबा अनुसंधान केंद्रात वास्तविक १९७५ मध्येच या जातीची कलमे लावली गेली होती मात्र आंबा बागायतदरांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. मालीहाबाद भागात या जातीच्या काही आमराया आहेत. आंब्याची गुणवत्ता आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन आता मात्र अनेक बागाईतदार या आंब्याचे उत्पादन घेत आहेत.

हा आंबा अन्य जातीच्या आंब्यापेक्षा उशिरा येतो. कर्नाटक, तामिळनाडू मध्ये त्याची व्यावसायिक लागवड आहे. या आंब्याचे विशेष म्हणजे त्याची तोड अगदी योग्य वेळी करावी लागते. तरच त्याला गोड आंबट असा अतिशय सुंदर स्वाद येतो. आंब्याचा गर् घट्ट आणि कोय पातळ असते. ग्राहकाने एकदा या आंब्याची चव घेतली की ग्राहक त्याच्या प्रेमातच पडतो असा अनुभव सांगतात.