ईद साठीच्या या बकऱ्याची किंमत १ कोटी?

उद्या म्हणजे २१ जुलै रोजी मुस्लीम लोकांचा बकरी ईद हा महत्वाचा सण साजरा होत असून बकरी खरेदीसाठी बाजार सजले आहेत. करोना मुळे या वर्षी सुद्धा बाजारात फारशी गर्दी नाही. महाराष्ट्राच्या बुलढाणा बाजारात टायगर नावाचा एक बकरा चर्चेत आला असून त्याची किंमत आहे १ कोटी रुपये. या बकऱ्याला नुसते पाहण्यासाठी सुद्धा बाजारात गर्दी होत आहे.

आत्तापर्यंत टायगर साठी ५१ लाखाची बोली लागली आहे मात्र मालकाला १ कोटी रुपये हवे आहेत. बकऱ्याच्या शरीरावर जन्मापासूनच अल्लाह अक्षरे आहेत. बकरा अगदी तगडा आणि ताकदवान आहे. त्याला आवरायला दोन माणसे लागतात असे समजते. हा बकरा बाजारात येताच लगेचच त्याला ३६ लाखाची ऑफर आली होती असेही समजते. पण मालकाने मात्र १ कोटी रुपये मिळाले तरच बकरा विकणार असे जाहीर केले आहे.

मुस्लीम समुदायात ईद हा मोठा सण आहे. इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहीम यांनी त्यांचा मुलगा हजरत इस्माईल याच दिवशी खुदाच्या हुकामानुसार कुर्बान करण्याचे पाउल उचलले होते पण अल्लाहने त्याला जीवदान दिले. त्यांच्या स्मृतीनिमित्त हा सण साजरा केला जातो.