पुण्यातील त्या होर्डिंगवरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रोल


पुणे – सध्या होर्डिंगवरून राजकारण होत असल्याचे महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. दिग्गज राजकारण्यांना या होर्डिंगवरून ट्रोल करण्यात येत आहे. काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत होती. त्यांच्या होर्डिंगचा फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे मोठे होर्डिंग पुण्यात लावण्यात आले आहेत. त्यातील एका होर्डिंगवर नव्या पुण्याचे शिल्पकार, म्हणून फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.


अमोल मिटकरी म्हणाले, आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटते यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त.

दरम्यान, ट्विटरवर या होर्डिंगचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एका युझर्सने लिहले आहे की, पुण्य नगरीसाठी शुन्य नेतृत्व आहे, महापौरांनी बॅनरबाजीसाठी वेगळच बजेट काढलेले दिसत आहे, तयारी महानगरपालिकेची. तर एकाने लिहले आहे की, पोस्टर बघून फडणवीसांनाही हसू येत आहे. तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको, सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण पक्षाच्या आदेशाआधीच वाढदिवसाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी केले आहे.

होर्डिंग, बॅनर, जाहिरातबाजी कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.