सिमल्याला जाताय? मग या जागा टाळाच

करोना लॉकडाऊन शिथिल होऊ लागल्याने अनेकांनी भ्रमंतीचे प्लान केले आहेत. हे दिवस हिमालय भेटीचे मस्त दिवस म्हणता येतील कारण त्या भागात हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे हवा एकदम तरोताजा करणारी असते. अर्थात थंडीत बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी सुद्धा पर्यटक हिमाचल, उत्तराखंड अश्या राज्यांना भेटी देतात. हिमाचलची राजधानी सिमला पर्यटकांचे नेहमीच आवडते ठिकाण ठरले आहे. तुम्ही सुद्धा सिमल्याला भेट देण्याच्या विचारात असाल तर तेथे काय काय पाहायला हवे याची खूप माहिती मिळविता येईल. आम्ही येथे सिमल्याला गेलात तर कोणत्या जागा टाळा याची माहिती देत आहोत.

सिमला हायवे वरून छोटा सिमला येथे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्यावर रस्त्याच्या मधेच चुडेल बौडी हा भाग आहे. ही जागा झपाटलेली असून हा पॉइंट पार केला की वाहनांचा वेग आपोआप कमी होतो. एक म्हातारी गाडीत लिफ्ट मागते आणि तुम्ही काही म्हणायच्या आत स्वतः गाडीत येऊन बसते असे सांगतात. या रस्त्यावर अनेक अपघात होतात अशी याची ख्याती आहे.

हिरव्यागार डोंगररांगात चार्ली व्हिला नावाची एक हवेली आहे. ब्रिटीश कालीन या हवेलीत ब्रिटीश अधिकारी व्हेक्टर आणि त्याची पत्नी काही काळ राहिले होते. पण या हवेलीत अजब घटना घडतात. एक ब्रिटीश माणूस दिसतो आणि गायब होतो. अनेकदा वस्तू आपोआप फुटतात असे सांगतात. आता एका भारतीय माणसाने ही हवेली खरेदी करून त्याला नवे रूप दिले आहे.

जीझस मेरी कॉन्वेंट स्कूल ही अशीच एक आणखी भयानक जागा. असे म्हणतात येथे १३ तारखेला जो शुक्रवार असेल त्या दिवशी बिन मुंडक्याचा एक घोडेस्वार येतो. एखाद्या मुलीला गुलाबाचे फुल देतो. तिने ते घेण्यास नकार दिला तर मुलीलाच सोबत घेऊन जातो. या मैदानावर पूर्वी कबरीस्तान होते. २०१२ मध्ये एका लहान मुलीचा मृतदेह येथे सापडला होता. या मुलीचा आत्मा सुद्धा येथे फिरतो असे म्हटले जाते.

इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजची जागा अशीच झपाटलेली आहे. रुग्ण, डॉक्टर, रुग्ण नातेवाईक यांना अनेकदा लिफ्ट, कॉरिडोर मध्ये अजब घटना अनुभवास आल्या आहेत. दखनी हाउस हे सुंदर घर असेच डोंगरावर आहे. येथे सुद्धा एका म्हाताऱ्या माणसाचे भूत दिसते. फाटके कपडे घालून तो फिरतो. त्याने स्वतः ला गोळी मारून घेतली होती असे सांगतात.