ब्रिटन मध्ये करोना नियंत्रणे संपली, बोरीस जॉन्सन होम आयसोलेशनमध्ये

१९ जुलै रोजी ब्रिटन मध्ये करोना संदर्भात लागू असलेली सर्व नियंत्रणे उठवली गेली असून आता मास्क घालणे अथवा न घालणे हा वैयक्तिक निर्णय असेल असे जाहीर केले गेले आहे. विशेष म्हणजे करोनाच्या डेल्टा व्हेरीयंट ने ब्रिटन मध्ये हाहाकार माजविला असून दररोज ५४ हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर करोना नियंत्रणे हटविली गेली आहेत. मात्र पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांना १० दिवस होम आयसोलेशन मध्ये राहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनचे आरोग्यमंत्री करोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही पुन्हा करोना पोझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी आरोग्य मंत्री साजिद जावेद यांच्याबरोबर एका बैठकीत बोरीस जॉन्सन आणि ऋषी सुनक सामील झाले होते. साजिद यांची शनिवारी केलेली करोना टेस्ट पोझिटिव्ह आली आहे. त्यांच्यात करोनाची हलकी लक्षणे दिसत आहेत.

जॉन्सन यांनी साजिद यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याने त्यांच्या संपर्कात येऊनही होम आयसोलेशमध्ये राहण्यास नकार दिला होता मात्र त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी टीकेचा भडीमार केल्याने अखेर त्यांनी होमआयसोलेशन मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे समजते.

लॉकडाऊनचे सर्व नियम ब्रिटन मधून हटविले गेले असले तरी अॅप आधारित टेस्ट अँड ट्रेस प्रणालीचा वापर केला जात आहे. अर्थात हे बंधनकारक नाही. या मध्ये हे अॅप मोबाईलवर असेल तर युजरला करोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यास होम आयसोलेशची सूचना मिळते. पंतप्रधान जॉन्सन एप्रिल २०२० मध्ये करोना संक्रमित झाले होते आणि त्यांना तीन दिवस आयसीयु मध्ये काढावे लागले होते. देशात बंधने हटली असली तरी नागरिकांना सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे.