बुटक्या राणी गाईसह सेल्फी घेण्यासाठी झुंबड

बांग्लादेशात सध्या २३ महिने वयाची एक गाय खुपच चर्चेत आहे. राणी नावाची ही गाय बुटबैगन असून तिची उंची फक्त २६ इंच आहे. तिचे वजन सुद्धा २६ किलो आहे. जगातील ही सर्वात छोटी गाय असल्याचे दावा तिचे मालक करत आहेत. या राणीचे फोटो व्हायरल झाल्यापासून ढाक्यापासून ३० किमी वर असलेल्या चारीग्राम या गावी अनेक लोक तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मुद्दाम वाट वाकडी करून येत आहेत. राणी सध्या टीव्ही आणि वर्तमानपत्रात स्टार म्हणून गाजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अॅग्रो फार्म व्यवस्थापक हसन सांगतात, गेल्या काही दिवसात करोना असूनही १५०० पेक्षा अधिक लोक राणीला पाहायला आणि तिच्यासोबत फोटो काढून घ्यायला आले आहेत. मालकाला त्यांचा आता कंटाळा आला आहे. ही गाय भूतानी जातीची असून या गाईचे मांस बांग्ला देशात मोठी मागणी असलेले आणि महाग आहे. या जातीच्या गाईंची सर्वसाधारण जी उंची असते त्याच्या निम्मीच राणीची उंची आहे. जेनेटिक इनब्रिडिंग मधून राणीचा जन्म झाला आहे आणि तीची उंची वाढण्याची आता शक्यता नाही.

गिनीज बुक मध्ये जगातील सर्वात कमी उंचीची गाय ६१ सेंटीमीटरची असून हे रेकॉर्ड २०१४ साली नोंदवले गेले आहे.