कोण म्हणतं चीनी बुटके असतात?

सर्वसाधारणपणे आशियाई उंचीला कमी असतात असे दिसते. त्यातही चीन व जपानची माणसे जरा जास्तच बुटकी असतात असा आजपर्यंतचा अनुभव, अर्थात या नियमाला अपवाद आहेत. पण चीन मधल्या एका १४ वर्षीय कन्येने सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. झांग जीयू नावाची ही शाळकरी मुलगी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड मध्ये असून तिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

१४ वर्षाची झांग बास्केटबॉल खेळाडू आहे आणि तिची उंची आहे ७ फुट ५ इंच. चीनच्या शान्ग्डोंग भागात ती राहते. अंडर १५ महिला बास्केटबॉल लीगच्या अंतिम स्पर्धेत तिने तिच्या टीमला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे. चीनी मायक्रोब्लोगिंग साईट विबोवर झांगने ४२ पॉइंटसह टीमला विजय मिळवून दिल्याचे म्हटले आहे. तेव्हापासून झांग एकदम ट्रेंड मध्ये आली आहे.

झांगचे आईवडील सुद्धा बास्केटबॉल प्लेअर आणि उंचीने अधिक आहेत. वडील ६ फुट ४ इंच तर आई सहा फुट उंच आहे. ते दोघेही व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू आहेत. प्राथमिक शाळेत असतानाच झांगची उंची ५.२ फुट होती आणि १४ व्या वर्षात ती ७ फुट ५ इंचावर गेली आहे. आणखी मोठी झाल्यावर ती किती उंच होईल याचे अंदाज वर्तवले जात आहेत.