हे आहेत देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी


आपल्यापैकी अनेक जणांचे देशातील प्रतिष्ठीत आणि आव्हानाची परीक्षा देऊन आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. पण आपल्या देशातील काही तरुणांनी ही अवघड अशी परीक्षा अगदी कमी वयात उत्तीर्ण केली आहे. आज देशातील त्याच सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2015 साली आयएएस झालेल्या अन्सार अहम्मद शेखचे या यादीत प्रथम नाव आहे. अन्सारचे वडील रिक्षाचालक असून अन्सार सांगतात, दिवसाला माझे वडील 100 ते 150 रुपये कमवायचे. रात्रीचे जेवणही अनेक वेळेला करता येत नव्हते. पण आता माझ्या वडिलांचे मी आयएएस अधिकारी होऊन स्वप्न पूर्ण केले आहे. पश्चिम बंगाल सरकारमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर अन्सार शेख हे काम करत आहेत.

रोमन सैनीचे या यादीत दुसरे नाव आहे. वयाच्या 22 व्या वर्षी रोमन यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. देशात ते 18 वे आले होते. यूपीएससीचे कोचिंग घ्यायचे असेल तर त्यासाठी खूप खर्च येत असल्यामुळे हा खर्च प्रत्येकजण करू शकत नसल्यामुळेच रोमन सैनी यांनी ऑनलाइन ट्रेनिंगच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 2015 मध्ये यासाठी नोकरीचा राजीनामा दिला.

राजस्थानच्या स्वाती मीणा नाइक यांचे तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत तिसरे नाव आहे. 22 व्या वर्षीच मीणा यांनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. देशात 260 वा क्रमांक 2007 साली ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या स्वाती यांचा होता. त्या सध्या मध्य प्रदेश राज्य सहकारी विपणन सेवेत कार्यरत आहेत.

या तरुण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये अमृतेश औरंगाबादकर यांचाही समावेश आहे. 2011 मध्ये यूपीएससी परीक्षा अमृतेश यांनी उत्तीर्ण केली. देशात त्यांनी 10 वा क्रमांक मिळवला होता. 2012 च्या गुजरात केडरचे पुण्याचे अमृतेश औरंगाबादकर अधिकारी आहेत. सध्या वडोदराचे प्रादेशिक आयुक्त आहेत.

अंकुर गर्ग हेही देशातील तरुण आयएएस अधिकारी असून 2002 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी अंकुर गर्ग यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. ते त्यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सर्वात तरुण अधिकारी होते. अंकुर गर्ग हे आयआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत. सध्या ते हॉवर्ड विद्यापीठाचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

Leave a Comment