बँकेने तुमच्या तक्रारीकडे कानाडोळा केल्यास येथे करा तक्रार


नवी दिल्ली : कोणत्याही बँकेत तुमचे अकाऊंट असेल आणि या बँकेच्या सुविधांविषयी तुम्हाला काही तक्रारी असतील तर आता आपली तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण, आता एकाच ठिकाणी तक्रार नोंदवून तुम्ही तुमच्या समस्येवर उपाय मिळवू शकणार आहात.

यासंदर्भात ‘झी बिझनेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, आता खुद्द बँकांची शिखर बँक अर्थात ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ बँक ग्राहकांच्या तक्रारींसाठी पुढे सरसावली आहे. लवकरच एक कम्प्लेन्ट मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच सीएमएस ‘आरबीआय’कडून लॉन्च करण्यात येणार आहे. याद्वारे कोणत्याही बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींवर ई-मेल, लिखित पत्र, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांतून नजर ठेवण्यात येईल. आरबीआयकडून या तक्रारी संबंधित बँका आणि इतर संबंधित संस्थांना धाडण्यात येतील.

तुम्ही केलेल्या तक्रारी तुमच्या बँका कानामागे टाकत असतील तर त्यावर आता ग्राहकांना उपाय सापडला आहे, असे म्हटले वावगे ठरणार नाही. आरबीआयचे सीएमएस (CMS) तयार असून ते कोणत्याही दिवशी लॉन्च केले जाऊ शकते. बँकांशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी सध्या तरी तीन बँकिंग ओम्बुडसमॅनची व्यवस्था आहे. याशिवाय तक्रार यंत्रणाही पूर्णपणे ऑनलाईन नाही. परंतु, आरबीआयच्या या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना घरबसल्या आपल्या बँकांच्या तक्रारी शिखर बँकेपर्यंत पोहचवता येऊ शकतील. त्यामुळे आरबीआयचा इतर बँकांवरचा वचकही कायम राहायला मदत होईल.

Leave a Comment