हा चित्रकार चक्क समुद्राच्या आत करतो पेंटिंग


हवाना – जगात अनेक कलाकार आहेत जे आपल्या अनोख्या कलेमुळे ओळखले जातात आणि सध्यातर त्यांच्या कला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत असते. क्यूबामधील असाच एक कलाकार असून तो चक्क खोल समुद्रात जाऊन चित्र काढतो. सँडर गोंजालेस असे 42 वर्षाच्या या चित्रकाराचे नाव आहे. सँडर यांनी सांगितले की, ते 6 वर्षांपूर्वी स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी गेले होते. दरम्यान ते समुद्रामध्ये असणाऱ्या नैसर्गिक शांततेमुळे आकर्षित झाले.

गोंजालेसनुसार, समुद्रात स्पेनमधील एका जीवशास्त्रज्ञाने पेंटिंग केल्याचे ऐकले असल्यामुळे हा प्रयोग करण्याचा निर्णय सँडनेसुद्धा घेतला. चित्र पाण्यात खराब होऊ नये म्हणून त्यांनी चारकोल (कोळसा) आणि ऑइल रंगाचा वापर केला. तसेच, समुद्रात कॅनव्हास घेऊन जाण्यापूर्वी गोंजालेस त्याला मीठ किंवा इतर सेंद्रिय पदार्थांनी धुवून घेतात.

समुद्रात चित्रकला साकारणे एखाद्या छंदासारखे होते. पण त्यांना त्यानंतर याची आवडच निर्माण झाली. त्यांचा ‘बे ऑफ पिग्स’ आवडता स्पॉट आहे. अनंत शांतता समुद्रामध्ये असते आणि चारी बाजूने नैसर्गिक वस्तू असतात. त्यामुळे तिथे आपल्याला काम करताना एक वेगळाच आनंद येतो. गोंजालेस समुद्रात गेल्यानंतर काही अंतर पोहल्यानंतर पेंटिंगसाठी जागा निवडतात. पण समुद्रतटपासून 20 फूट खोल पाण्यातच गोंजालेस हे पेंटिंग करतात. तसेच, ते समुद्रात जाण्यासाठी साधारणतः ऑक्सीजन टँक आणि पोहण्याच्या कपड्यासहित उतरतात.

गोंजालेस यांना चित्रकला करताना कॅनडातील एका पर्यटक माइक फेस्टरीगाने समुद्रात पाणबुडी दरम्यान पाहिले होते. माइक यांनी त्यावर सांगितले की, पेंटिंग समुद्रातही करता येते असा विचारसुद्धा केला नव्हता. त्यामुळे आता स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी गोंजालेस आकर्षणाचे केंद्र आहे. आपली पेंटिंग एक हजार डॉलर ( 70 हजार रूपये) मध्ये गोंजालेस विकतात. तसेच त्यांनी असा विश्वास दर्शविला की, सरकार पेंटिंग होत असलेल्या या भागाला ‘अंडरवॉटर आर्ट एरियाच्या’ रूपात विकसित करेल.

Leave a Comment