४७% जपानी लोकांना मिळत नाही मनासारखा जोडीदार


टोकियो – एक अजब समस्या जपानमध्ये निर्माण झाली असून तेथील विवाहाच्छुक ४७% तरुण-तरुणींना मनासारखा जोडीदार मिळत नाही. जोडीदार शोधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, हे एक त्यामागचे कारण सांगण्यात येते. ही आकडेवारी सरकारी सर्व्हेत निष्पन्न झाली आहे. सरकारच्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये २० ते ४० वर्षे वयातील ४ हजार पुरुष व महिलांनी सहभाग घेतला.

यापैकी ४७% लोकांनी सांगितले की, आम्ही लग्नासाठी योग्य जोडीदार शोधण्यात अपयशी ठरलो आहोत. जपानच्या घटत्या जन्मदराचाही उल्लेख या अहवालात आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या २९ टक्के लोकांनी सांगितले, आमच्याकडे लग्न करण्याएवढे पैसे नाहीत, तर बहुतांश लोकांनी म्हटले, जोडीदार शोधण्यासाठी वेळच मिळाला नाही. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. बंधनात राहणे आम्हाला आवडत नसल्यामुळे आम्ही लग्न करणार नाही, असे ३१ % तरुणींनी सांगितले.

देशातील ज्येष्ठांची वाढती संख्या ही समस्या असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी म्हटले आहे. लोकांनी मुले जन्माला घालावीत म्हणून आम्ही प्रोत्साहन योजना लागू करत आहोत. जपानमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चच्या अंदाजानुसार २०४२ मध्ये ज्येष्ठांची संख्या (६५ व त्यावरील वयांची मंडळी)३ कोटी ९५ लाख होईल.

Leave a Comment