१० ते १४ वयाची मुले सांभाळतात हे रेल्वेस्टेशन


देश विदेशात वाहतुकीसाठी रेल्वे सर्वात सोपे आणि सहज साधन बनले आहे. भारतीय रेल्वे तर देशातील सर्वाधिक कर्मचारी असलेली रेल्वेसेवा आहे. जगभरात रेल्वेविभागात काम करणारे कामगार लाखोंच्या संख्येने आहेत. रेल्वेचा कारभार सांभाळणे हा मोठा व्याप आहे. पण हंगेरीच्या बुडापेस्ट जवळील पहाडात जंगलात असलेले एक रेल्वे स्टेशन १० ते १४ या वयोगटातील मुले मुली सांभाळतात असे सांगितले तर विश्वास ठेवणे अवघड आहे. मात्र ही सत्य कथा आहे, चारी बाजूनी जंगलांनी वेढलेले हे स्टेशन येथील जंगल आणि पर्वतांसाठी नाही तर लहान मुलांनी चालविलेले स्टेशन म्हणून प्रसिद्धीस आले आहे.


या स्टेशनचे संचालन पूर्णपणे मुले करतात. तिकीट देणे, डीझेल इंजिन देखभाल, सिग्नल, गार्ड आणि रेल्वेचे वेळापत्रक सर्व मुले मॅनेज करतात. गतवर्षी या स्टेशनने ७० वा वर्धापन दिन साजरा केला. या स्टेशन चालकांना यंगस्टर ऑफ गिएर्मेक्वॉस रेल्वे स्टेशन असे म्हटले जाते आणि ही मुले लाल, निळ्या, पांढऱ्या स्मार्ट गणवेशात कुशलतेने रेल्वे स्टेशनची जबाबदारी पार पडताना दिसतात. रेल्वेची तपासणी तीच करतात आणि रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडताना सलामही करतात.


साम्यवादाच्या काळातील आठवण करून देणारी ही रेल्वे हंगेरी सोव्हिएत युनियनचा भाग होता तेव्हा सुरु झाली होती. त्याकाळी मुलांना सहकार्य, सहकार आणि एकत्र जबाबदारी कशी पार पडायची याचा अनुभव मिळावा म्हणून प्रायोगिक तत्वावर हे काम सुरु केले गेले होते. तेव्हा लहान वयाची मुले मोठ्या माणसांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असत.

साम्यवाद संपला तरी आजही हे रेल्वेस्टेशन तसेच सुरु ठेवले गेले आहे. आता कम्युनिझम मागे पडलेय पण ही सेवा चिल्ड्रनस रेल्वे रुपात सुरु आहे. स्थानिक मुलांना दर पंधरा दिवसांनी १ दिवस येथे काम करता येते. त्यासाठी शाळेतून सुट्टी मिळते. १० ते १४ वयोगटातील मुले यात सामील होऊ शकतात. पर्यटकांसाठी हे रेल्वेस्टेशन एक आकर्षण बनले आहे.

Leave a Comment