शरद पवारांचा वरदहस्त आहे, म्हणूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे ; अमोल कोल्हेंची टीका


पुणे – राज्यातील सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन केली. पण या आघाडीत धुसपूस सुरूच असल्याचे अनेकवेळा आपण ऐकले असेल. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. आता थेट शिवसेनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला लगावला आहे.

खासदार कोल्हे म्हणाले की, शरद पवार साहेबांचा वरदहस्त डोक्यावर आहे, म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदारांना काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करत आहे. महाविकास आघाडीत खासदार कोल्हेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या कामासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा माजी खासदार आढळराव पाटील यांचा फोटो रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेवर नसल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. दरम्यान संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसह आढळराव पाटील यांनी शुक्रवारीच खेड आणि नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले. यावरून अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.