सोमवारपासून सुरु होणार नाशिकमधील शाळा, सर्व कार्यक्रमांवर बंदी; छगन भुजबळांची घोषणा


नाशिक : नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाची तिसरी लाट, डेल्टा व्हेरियंट आणि बाधितांच्या संख्येतील वाढ या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आज नाशिकमधील कोरोना स्थितीचा भुजबळ यांनी आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निर्बंधांची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये उद्यापासून सरकारी, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

73 लाख नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या आहे. आतापर्यंत 12 लाख 81 हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 80 हजार लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे. बाकी लोकांची लसीकरण अद्याप झालेले नाही. ऑगस्टमधील पहिल्या आठवड्यापर्यंत लसीचा साठा सुरळीत होईल. तसेच ऑक्सिजनचे उद्दिष्टही जास्त ठेवले असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून ज्या गावात मागील एक महिन्यात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही, अशा गावातील शाळा सुरु होत असल्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 24 शाळांपैकी कोरोनामुक्त 335 गावातील 296 शाळा सुरु होत आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल. शाळांना नियम पाळावे लागतील. गावात रुग्ण सापडला तर शाळा बंद केल्या जातील, असेही भुजबळ यांनी सांगितले.

उद्यापासून जिल्ह्यातील राजकीय, सरकारी आणि सामाजिक कार्यक्रम बंद करण्यात येत आहेत. फक्त ऑनलाईन कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल. दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहतील. त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना देता येणार नाही. त्याचबरोबर विकेंडला जमावबंदीचे आदेश लागू असतील. सध्यस्थितीमुळे निर्बंध शिथिल होणार नाही. उलट अधिक कडक केले जातील, असे संकेतही भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत.